Afridi on Umran Malik, IND vs PAK: जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी 'टीम इंडिया'मध्ये स्थान मिळाले. IPL 2022 मध्ये त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे अवघ्या २२ वर्षांचा असूनही त्याला 'टीम इंडिया'मध्ये प्रवेश मिळाला. या आनंदाच्या वेळी उमरानने माजी भारतीय क्रिकेटर आणि आपला गुरू इरफान पठाणसोबत सेलिब्रेशन केले. उमरान मलिकने IPL 2022 मध्ये सातत्याने ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी केली. या मोसमात उमरानने ताशी १५७ किमी वेगाने सर्वोत्तम चेंडू टाकला. त्याचे सर्वत्र कौतुक होत असताना पाकिस्तानी क्रिकेटपटू आफ्रिदीला मात्र हे रुचलं नाही. त्यामुळे त्याने दर्पोक्ती केली.
"नुसत्या वेगाने काहीही होत नाही. मी कधीच तितक्या वेगाने गोलंदाजी करण्याचा विचार करत नाही. मला वैयक्तिक मत असं आहे की नुसत्या वेगाला गोलंदाजीत किंमत नाही. जर तुमच्या गोलंदाजीत लाईन, लेंथ आणि स्विंग नसेल तर तुम्ही फलंदाजाला हुकवू शकणार नाही. मी सध्या माझ्या फिटनेसवर जास्त मेहनत घेत असतो. जेणेकरुन माझा गोलंदाजीतील वेगही वाढेल. मला अशी अपेक्षा आहे की मी वेगवाग गोलंदाजी करावी. पण त्यासोबतच माझी लाईन आणि लेंथदेखील सर्वोत्तम असायला हवी याकडे मी लक्ष देईन", अशा शब्दांत शाहिद आफ्रिदीचा जावई आणि पाक गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने उमरान मलिकच्या गोलंदाजीबाबत मत व्यक्त केलं.
शोएब अख्तरनेही उमरानला लगावला होता टोमणा
“मला उमरान मलिकची प्रदीर्घ कारकीर्द बघायची आहे. मी क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. आतापर्यंत कोणीही तो विक्रम मोडू शकलेला नाही. उमरानने जर माझा विक्रम मोडला तर मला आनंदच होईल. फक्त माझा विक्रम मोडताना त्याने स्वत:ची हाडे मोडून घेऊ नयेत", असं खोचक विधान शोएब अख्तरने केले होते. पण त्यासोबतच, "उमरानला नक्कीच भारतीय संघात स्थान मिळायला हवं. मला त्याला खेळताना बघायचे आहे. १५० चा टप्पा ओलांडलेले फार कमी लोक आहेत. उमरान मलिक सातत्याने १५० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. हे पाहून आनंद झाला. मला फिरकीपटू बघून कंटाळा आला आहे. पण उमरानची वेगवान गोलंदाजी पाहून खूप आनंद होतो”, असंही अख्तर म्हणाला होता.