India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळी नंतरही भारताला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली. संजूने शार्दूल ठाकूरसह ९३ धावांची भागीदारी करून अखेरपर्यंत खिंड लढवली. आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर व हेनरिच क्लासेन यांना जीवदान देणे भारताला महागात पडले आणि या दोघांनी १३९ धावांची भागीदारी करून आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही आणि आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी यजमानांच्या धावांवर लगाम लावण्यात यश मिळवले. तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेकडे १-० अशी आघाडी आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देत होती आणि शम्सी व केशव महाराज भारतीय फलंदाजांना नाचवत होते. महाराजने १८व्या षटकात इशानला ( २०) माघारी पाठवून भारताला चौथा धक्का दिला. श्रेयस व संजू यांची ५४ चेंडूंवर ६७ धावांची भागीदारी लुंगी एनगिडीने संपुष्टात आणली. श्रेयस ३७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५० धावांवर बाद झाला. संजूने आता सूत्र हाती घेताना शार्दूल ठाकूरसह अर्धशतकी धावा जोडल्या. पण, विजयासाठी भारताला १२. ३०च्या सरासरीने धावा करण्याची गरज होती. या जोडीला हा वेग पकडता येत नव्हता आणि ३० चेंडूंत ७३ धावा करायच्या होत्या. संजूने ४९ चेंडूंत वन डेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. शार्दूलने ३७व्या षटकात रबाडाच्या गोलंदाजीवर तीन खणखणीत चौकार खेचले.
एनगिडीने ३८व्या षटकात ६६ चेंडूंत ९३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली आणि त्याने शार्दूलला ( ३३) बाद केले. पुढच्याच चेंडूवर त्याने कुलदीप यादवलाही माघारी पाठवले. १२ चेंडूत ३७ धावांची गरज भारताला होती. एनगिडीने ५२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आवेश खानला एक धाव घेऊन संजूला स्ट्राईक देणेही जमत नव्हते. कागिसोच्या ५ चेंडूवर त्याने केवळ २ धावा केल्या आणि भारताच्या हातून सामना गेला. रबाडाने त्या षटकात ७ धावा दिल्याने आता भारताला ६ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या व संजू स्ट्राईकवर होता.
पहिला चेंडू Wide गेल्यानंतर संजूने पुढचा चेंडू षटकार खेचला. त्यानंतर चौकार मारला आता ४ चेंडूंत १९ धावा करायच्या होत्या. संजूने पुन्हा चौकार खेचला, परंतु चौथा चेंडू निर्धाव गेला. दोन चेंडूंत १५ धावा करायच्या असताना संजूने चौकार खेचला. अखेरच्या चेंडूवर संजूला १ धाव करता आली आणि आफ्रिकेने ९ धावांनी सामना जिंकला. संजू ६३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद राहिला. भारता ला ८ बाद २४० धावा करता आल्या.
डेव्हिड मिलर- हेनरिच क्लासेन यांची शतकी भागीदारी...क्विंटन डी कॉक आणि यानेमन मलान ( २२) यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. टेम्बा बवुमा ( ८) याचा शार्दूलने त्रिफळा उडवला. क्विंटन व हेनरिच क्लासेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रवी बिश्नोईने महत्त्वाची विकेट टिपली. ५४ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावा करणाऱ्य़ा क्विंटनला त्याने पायचीत केले. शार्दूलने ८-१-३५-२ अशी कामगिरी केली. कुलदीपने ८ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली. अखेरच्या षटकांत मिलर व क्लासेन यांनी फटकेबाजीला सुरुवात केली. क्लासेनने ६५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या, तर मिलर ६३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ४ बाद २५० धावा केल्या. या दोघांनी १०६ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली.