KL Rahul vs IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताचा पहिला डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवशी गडगडलेल्या भारतीय डावाला उपकर्णधार केएल राहुलच्या शतकामुळे काहीसा आधार मिळाला. रोहित, विराट, यशस्वी, शुबमन आणि श्रेयस अय्यर हे पाचही फलंदाज अयशस्वी ठरले पण राहुलने एकट्याने झुंज देत १०१ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान पहिल्या दिवशी एक विचित्र किस्सा घडला ज्याची चांगलीच चर्चा रंगली.
मार्को यान्सेन गोलंदाजी करत असताना केएल राहुलने त्याला एक दमदार चौकार खेचला. यान्सेनला ते अजिबातच रुचले नाही. यान्सेन मैदानात राहुलशी हुज्जत घालताना आणि बाचाबाची करताना दिसला. पण राहुलने फार काही केले नाही. तो अतिशय शांतपणे खेळत राहिला आणि त्याने त्याला फक्त बॅटनेच उत्तर दिले. यान्सेनने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यावर राहुल केवळ हसला आणि पुढे खेळू लागला. राहुलची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याचे खूप कौतुक होत आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ५, युवा यशस्वी जैस्वाल १७ तर शुबमन गिल २ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ६८ धावांची भागीदारी केली. पण अय्यर ३१ आणि विराट ३८ धावांवर माघारी परतला. शार्दुल ठाकूरने २४ धावांची झुंज दिली. पण रविचंद्रन अश्विन (८) आणि जसप्रीत बुमराह (१), मोहम्मद सिराज (५) झटपट बाद झाले. केएल राहुलने मात्र एकाकी झुंज देत १३३ चेंडूत शतक झळकावले. त्याने आपल्या डावात १४ चौकार आणि ४ षटकार मारले.