India vs South Africa, 2nd ODI Live Updates : कसोटी मालिकेपाठोपाठ भारताला वन डे मालिकेतही यजमान दक्षिण आफ्रिकेनं पराभवाची चव चाखवली. आज पुन्हा एकदा फलंदाजांनी पाट्या टाकल्या. रिषभ पंत, लोकेश राहुल आणि शार्दूल ठाकूर वगळता इतरांची कामगिरी समाधानकारक झाली नाही. विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही. गोलंदाजीत टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली. भुवनेश्वर कुमारची लय पूर्णपणे बिघडलेली जाणवली. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सहज धावा करताना दिसले. क्विंटन डी कॉक व येनमन मलान यांनी रचलेल्या भक्कम पायावर कर्णधार टेम्बा बवुमा,एडन मार्कराम व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी विजयी कळस चढवला. मलान व बवुमा पाठोपाठ बाद झाल्यानं भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु गोलंदाजांना पुनरागमन करता आले नाही. आफ्रिकेनं हा सामना सहज जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन २९ धावांवर बाद झाला. रिषभ पंत व लोकेश यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ३२व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. सिसांडा मगालाच्या गोलंदाजीवर लोकेश ५५ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात तब्रेझ शम्सीच्या गोलंदाजीवर रिषभ झेलबाद झाला.रिषभनं ७१ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ८५ धावा केल्या. श्रेयस अय्यर व वेंकटेश अय्यर यांच्यावर पुढील १७ षटकं खेळून काढून स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. पण, श्रेयस ११ धावांवर तर वेंकटेश २२ धावांवर बाद झाला. क्विंटन डी कॉकनं पुन्हा एकदा अप्रतिम स्टम्पिंग करून वेंकटेशला माघारी पाठवले. शार्दूलची फटकेबाजी सुरू राहिली. आर अश्विननेही जरा हात मोकळे केले. भारतानं ६ बाद २८७ धावांचा डोंगर उभा केला. शार्दूल ४०, तर अश्विन २५ धावांवर नाबाद राहिले.
मलान व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. मलाननं अर्धशतकी खेळी करून तीन आकडी धावांच्या दिशेनं कूच केली. पण, जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेला दुसरा धक्का देताना मलानला नर्व्हस ९०s मध्ये बाद केले. मलान १०८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ९१ धावांवर त्रिफळाचीत झाला. मात्र, त्यानं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी १२ डावांमध्ये ७०० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. मलान व बवुमा यांनी ७६ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. पुढच्या षटकात युजवेंद्र चहलनं आफ्रिकेच्या सेट फलंदाजाला बवुमाला ( ३५) माघारी पाठवले.
संक्षिप्त धावफलक - भारत ६ बाद २८७ धावा ( रिषभ पंत ८५, लोकेश राहुल ५५, शार्दूल ठाकूर ४०*, शिखर धवन २९, आर अश्विन २५*; तब्रेझ शम्सी २-५७) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ३ बाद २८८ धावा ( येनमन मलान ९१, क्विंटन डी कॉक ७८, टेम्बा बवुमा ३५, एडन मार्कराम ३७*, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ३७* ).