केपटाऊन - भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांमधील सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने आघाडी घेतली आहे. तिस-या सामन्यात भारताने 124 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारताचा एकदिवसीय मालिकेतील हा सलग तिसरा विजय होता. भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने 4-4 विकेट्स घेत नवा रेकॉर्ड केला. मात्र या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय सामन्यात स्टमपच्या मागे 400 विकेट्स घेणारा महेंद्रसिंग धोनी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम हा धोनीचा 400 वा खेळाडू ठरला.
एकीकडे महेंद्रसिंग धोनी अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील चौथा खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा (482 स्टम्पिंग आणि विकेट) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आस्ट्रेलियाचा अॅडम गिलक्रिस्ट 472 विकेट्ससोबत दुस-या क्रमांकावर असून दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर 424 विकेट्ससोबत तिस-या क्रमांकावर आहे.
धोनीने दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळल्या गेलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर एडेन मार्करमची विकेट घेतली. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास स्टम्पच्या मागे हा रेकॉर्ड करणा-यांमध्ये धोनीनंतर नयन मोंगिया (154) आणि किरण मोरे (90) यांचा नंबर आहे. क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटबद्दल बोलायचं झाल्यास कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये धोनीने आतापर्यंत 770 विकेट्स घेतल्या आहेत. मार्क बाऊचर 998 विकेट्ससोबत पहिल्या आणि गिलक्रिस्ट 905 विकेट्ससोबत दुस-या क्रमांकावर आहे.