लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी अलाहबाद शहराचं नाव बदलून प्रयागराज असं केलं होतं. त्यांच्या या निर्णयावर चहूबाजुंनी टीका झाली. त्याच आदित्यराज यांनी स्टेडियमचेही नाव बदललं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील एकाना स्टेडियमचे नाव बदलले. त्यांनी या स्टेडियमला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे.
या स्टेडियमची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. या स्टेडियममध्ये एकूण नऊ खेळपट्टी आहेत. 24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तयार झालेल्या या स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 130 धावाही प्रतिस्पर्धीसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असा दावा क्युरेटरने केला आहे. या खेळपट्टीवर गवत आहे आणि काही ठिकाणी तडेही गेले आहेत. त्यामुळे ही स्लो बाऊसिंग खेळपट्टी असणार आहे आणि सुरुवातीपासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे.