लखनौः भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा ट्वेंटी-20 सामना आज लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 110 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली होती. वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले होते. त्यामुळे दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघ चुका सुधारण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तयार झालेल्या लखनौ येथील या स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. ट्वेंटी-20 म्हटलं की फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी, असे समीकरण हे जुळतेच. मात्र, लखनौच्या खेळपट्टीवर हे चित्र नेमकं उलट दिसणार असल्याचे, क्युरेटरने सांगितले. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 130 धावाही प्रतिस्पर्धीसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असा दावा क्युरेटरने केला आहे. या खेळपट्टीवर गवत आहे आणि काही ठिकाणी तडेही गेले आहेत. त्यामुळे ही स्लो बाऊसिंग खेळपट्टी असणार आहे आणि सुरुवातीपासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे.
बीसीसीआयचे प्रमुख क्युरेटर दलजीत सिंह यांना येथील खेळपट्टी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी रवींद्र चौहान, शिव कुमार आणि सुरेंद्र यांच्यासह मिळून ती तयार केली.