लखनौः भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला ट्वेंटी-20 सामना कोलकाता येथे खेळवण्यात आला. त्या सामन्यात भारताची 110 धावांच्या माफक लक्षाचा पाठलाग करताना दमछाक झाली. रोहित शर्मा, शिखर धवन या सलामीच्या जोडीसह मधली फळीही अपयशी ठरली. त्यामुळे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यापूर्वी भारताच्या फलंदाजांना सल्ला दिला आहे.
ओशाने थॉमसच्या गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली होती. त्याच्यासह कर्णधार कार्लोस ब्रेथवेटनेही आपल्या उंचीचा फायदा उचलत भेदक मारा केला. ''शॉर्ट बॉलचा सामना करताना भारताचे फलंदाज अडखळत होते. क्रिकेटमध्ये एका षटकात एकच बाऊंसरचा नियम आला आणि हेल्मेटचा उपयोग सुरू झाला तेव्हापासून फलंदाज बॅकफूटवर खेळणे विसरले आहेत,'' असे मत गावस्करांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,''ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला केवळ चारच षटकं टाकता येतात. त्यामुळेच भारताने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवला. विंडीजच्या चमूत थॉमसच्या मदतीला दुसरा गोलंदाज नव्हता. त्यामुळे संघाच्या लोव्हर मिडल ऑर्डरने भारताला विजय मिळवून दिला. भारतीय फलंदाजांनी बॅकफूटवर खेळायला शिकायला हवं.''