चेन्नई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत भारताने विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 182 धावांचे आव्हान ठेवले होते. भारत हा सामना सहजपणे जिंकेल असे वाटत होते. अखेरच्या चेंडूवर नशिब बलवत्तर म्हणून भारताला एक धाव मिळाली आणि त्यांनी सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी खिशात घातली.
कर्णधार रोहितने शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 12 ट्वेंटी-20 सामन्यांत 11 विजय मिळवले आहेत आणि जगात सर्वाधिक ट्वेंटी-20 विजय मिळवणाऱ्या कर्णधाराचा मान रोहितने पटकावला. विंडीजच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनने 92, तर रिषभ पंतने 58 धावा केल्या. पण या दोघांनीही आपल्या विकेट बहाल केल्या आणि सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. भारताने हा सामना जिंकण्यात यश मिळवले. कर्णधार म्हणून रोहितचा हा 11 वा ट्वेंटी-20 विजय होता. याचबरोबर त्याने शोएब मलिक, मायकल क्लार्क, असघर स्टॅनिकझाय आणि सर्फराज अहमद यांचा विक्रम मोडला. त्यांना कर्णधार म्हणून पहिल्या 12 ट्वेंटी-20 सामन्यांत केवळ 10 विजय मिळवता आले आहेत.
याशिवाय दोन ट्वेंटी-20 मालिका 3-0 अशा फरकाने जिंकणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितने याआधी डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेला 3-0 असी धुळ चारली होती. भारताने 3-0 अशा समान फरकाने तीन ट्वेंटी-20 मालिका जिंकून अफगाणिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या विक्रमात पाकिस्तान पाच मालिका विजयासह आघाडीवर आहे.