भारत पुन्हा निर्विवाद वर्चस्वासाठी प्रयत्नशील; किवींविरुद्ध पहिली एकदिवसीय लढत आज

खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:13 AM2020-02-05T03:13:07+5:302020-02-05T06:25:54+5:30

whatsapp join usJoin us
India again strives for undisputed domination; First ODI against New Zealand today | भारत पुन्हा निर्विवाद वर्चस्वासाठी प्रयत्नशील; किवींविरुद्ध पहिली एकदिवसीय लढत आज

भारत पुन्हा निर्विवाद वर्चस्वासाठी प्रयत्नशील; किवींविरुद्ध पहिली एकदिवसीय लढत आज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन : प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघात पृथ्वी शॉसारख्या गुणवान युवा खेळाडूसाठी दरवाजे उघडले गेले असून, तो बुधवारपासून येथे सुरु होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघासाठी ही तिसरी एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. संघाने यापूर्वी वेस्ट इंडिज (विदेशात) आणि मायदेशातील मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.

न्यूझीलंड संघ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरल्यानंतर पहिल्यांदाच एकदिवसीय लढत खेळणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांदरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने मँचेरस्टरमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. भारताने या पराभवाची परतफेड रविवारी संपलेल्या टी२० मालिकेत ५-० ने विजय मिळवत केली.

सध्या दोन्ही संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे अडचणीत आहेत आणि अशास्थितीत काही युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. टी२० मालिकेच्या अखेरच्या लढतीत दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो संपूर्ण दौऱ्यातून ‘आऊट’ झाला. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांच्यासारखे महत्त्वाचे खेळाडू यापूर्वीच दुखापतग्रस्त आहेत.

न्यूझीलंड संघ प्रेरणादायक कर्णधार केन विलियम्सनविना मैदानात उतरणार आहे. तो दुखापतग्रस्त आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही दुखापतग्रस्त असल्यामुळे यापूर्वीच संघाच्या बाहेर आहे. मयांक अगरवालला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रोहितच्या स्थानी संघात जागा मिळाली आहे. कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, ‘राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची रणनीती कायम ठेवणार आहे.’ तेथे लोकेश राहुलने यष्टिरक्षण करताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.

गोलंदाजी आक्रमणामध्ये भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरेल. टी२० मालिकेत ड्रेसिंग रुममध्ये बसणारा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल. साऊदीच्या तुलनेत कर्णधारपदासाठी त्याला झुकते माप देण्यात आले आहे. साऊदी टी२० मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात कर्णधार होता. यात संघाला रॉस टेलरच्या अनुभवाची साथ लाभेल. जिमी निशम व कॉलिन डी ग्रँडहोम यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे संघ मजबूत झाला आहे. यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल व वेगवान गोलंदाज काईल जेमिसन संघात नवे खेळाडू आहेत. 

कोहलीने एकप्रकारे संकेत दिले की, शॉ बुधवारी भारतीय डावाची सुरुवात करेल. असे जर घडले तर दोन सलामीवीर फलंदाज आपल्या पदार्पणाच्या लढतीत डावाची सुरुवात करतील. यापूर्वी अशी स्थिती २०१६ मध्ये आली होती. त्यावेळी लोकेश राहुल व करुण नायर यांनी झिम्बाब्वेमध्ये आपल्या पदार्पणाच्या लढतीत भारतातर्फे डावाची सुरुवात केली होती. त्याआधी, सुनील गावसकर व सुधीर नाईक (१९७४) इंग्लंडविरुद्ध तर पार्थसारथी शर्मा व दिलीप वेंगसरकर (१९७६) न्यूझीलंडविरुद्ध यांनी अशी कामगिरी केली होती.

कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल तर श्रेयस अय्यर चौथ्या व राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. नेट्समध्ये शिवम दुबे, रिषभ पंत आणि केदार जाधव यांच्यापूर्वी मनीष पांडे कोहली व अय्यरसोबत सराव करताना दिसला. जर पांडे खेळणार असेल तर संघात रवींद्र जडेजा, दुबे व जाधव यांच्यापैकी कुणा एका अष्टपैलूला संधी मिळेल.

भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी.

न्यूझीलँड : टॉम लॅथम (कर्णधार व विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम, जिमी निशम, स्कॉट कुगलेइजन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, हॅमिश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी, काइल जेमिसन आणि मार्क चॅपमेन.

Web Title: India again strives for undisputed domination; First ODI against New Zealand today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.