पोर्ट एलिझाबेथ - 25 वर्षानंतर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही प्रकारात मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतानं भारतानं आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत प्रथम स्थानावर उडी घेतली आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्या भारतीय संघानं 122 गुणांसह वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मालिका गमावल्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आता 118 गुण आहेत.
पाचव्या वन-डेतील विजयापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर 121 गुण तर भारतीय संघ 119 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. 73 धावांच्या मोठ्या विजयाचा भारतीय संघाला क्रमवारीत फायदा झाल्याचे पहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या सहा वन-डे मालिकेत भारतानं 4-1 ने मालिका विजय मिळवला आहे. इंग्लड (116), न्यूझीलंड (115) आणि ऑस्ट्रेलिया (112) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
सध्या भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर शिखरनं वन-डे मालिकेत आपला जलवा दाखवला आहे. शिखरनं दुसऱ्या वन-डेत अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली होती. दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीची जादू दक्षिण आफ्रिकेतही कायम आहे. तर रोहित शर्मानं मोक्याच्या क्षणी निर्णायक शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. सध्याचा भारतीय वन-डे संघ संतुलित भासत आहे. दक्षिण आफ्रिकेतील मैदानावर भारतीय गोलंदाजांनी आपली छाप सोडली. आफ्रिकेच्या गोलंदाजापेक्षा भारतीय गोलंदाजी आधिक घातक दिसत आहे. चहल-कुलदीप जोडीन ंपाच वन-डेत 30 विकेट पटकावण्याचा पराक्रम केला आहे.