फरिदाबाद: भारताने आज फरिदाबाद येथे झालेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा १० विकेट्स राखून पराभव केला.
खेळाच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार अजय रेड्डीने श्रीलंकेला फलंदाजी करण्यास पाचारण केले. पहिल्या सामन्यापासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांवर असलेले आपले वर्चस्व कायम ठेवत भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला २० षटकांमध्ये ८ बाद १५३ धावांवर रोखले.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या दीपक मलिक आणि अजय रेड्डी या सलामीच्या फलंदाजांनी १४ षटकांमध्ये अनुक्रमे नाबाद ८८ आणि नाबाद ५३ धाव करून भारताला १० गडी आणि ६ षटके राखून श्रीलंकेवर अगदी सहज विजय मिळवून दिला. भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाने १४ षटकांमध्ये १५४ धावा केल्या. नाबाद ८८ धाव करणारा दीपक मलिक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उद्यापासून भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ आता दिल्लीला रवाना झाले आहेत.