माऊंट मोनगानुई : टी२० क्रिकेटमध्ये सामन्याचे चित्र पालटण्यासाठी एक षटक पुरेसे ठरते आणि याचा अनुभव क्रिकेटविश्वाने रविवारी भारत वि. न्यूझीलंड सामन्यात घेतला. भारताने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची ९ षटकांत ३ बाद ६४ अशी अवस्था होती. मात्र शिवम दुबेच्या षटकात टिम सीफर्ट आणि रॉस टेलर यांनी मिळून तब्बल ३४ धावा कुटल्या आणि न्यूझीलंडने जबरदस्त पुनरागमन केले. यामुळे अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव होणार अशी शक्यता निर्माण झाली.
किवी संघ बाजी मारणार असे दिसत असतानाच नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांनी मोक्याच्यावेळी टिच्चून मारा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह यजमानांचा ७ धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ५-० असा व्हाईटवॉश दिला. सामन्यात भेदक मारा करणारा जसप्रीत बुमराह सामनावीर, तर मालिकेत २२४ धावा फटकावणारा लोकेश राहुल मालिकावीर ठरला.
एकवेळ भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. अखेरचा सामना जिंकून यजमान आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मानसिकरीत्या तयार होतील, अशी शक्यता होती. मात्र भारताच्या वेगवान त्रयीने अचूक मारा करताना संपूर्ण सामना फिरवताना पुन्हा एकदा किवींच्या हातातील सामना हिसकावून घेतला.
पराक्रमी ‘विराटसेना’!
भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश देणारा पहिलाच संघ ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाने दहाव्यांदा द्विपक्षीय टी२० मालिका जिंकली असून असा पराक्रम करताना विराट सेनेने फाफ डूप्लेसिसच्या नेतृत्त्वातील द. आफ्रिकेला मागे टाकले.
घरच्या मैदानावर न्यूझीलंडने सर्वाधिक २३वा टी२० सामना गमावला असून यासह त्यांनी श्रीलंकेच्या कामगिरीशी बरोबरी केली. शिवम दुबे टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला. त्याने स्टुअर्ट बिन्नीचा एकाच षटकात ३२ धावा देण्याचा विक्रम मोडला.
राहुलचे कल्पक नेतृत्त्व
नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती मिळाल्याने अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने संघाचे नेतृत्त्व केले. मात्र तो जायबंदी झाल्यानंतर लोकेश राहुलने संघाची धुरा वाहत कल्पकतेने गोलंदाजांचा वापर करत संघाला विजयी केले. मालिकावीर राहुल संपूर्ण मालिकेत फॉर्ममध्ये राहिलेला राहुल मालिकावीर ठरला. त्याने ५ सामन्यांत २ अर्धशतक झळकावून सर्वाधिक २२४ धावा कुटल्या.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांना पुन्हा एकदा शानदार पुनरागमन करताना विजयाकडे वाटचाल करणाऱ्या न्यूझीलंडचा रविवारी पाचव्या व अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ धावांनी पराभव केला. गेल्या दोन सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाने या शानदार विजयासह न्यूझीलंडचा पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० ने फडशा पाडला. भारताने तिसऱ्यांदा तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला.
न्यूझीलंडने भारतीय संघाला ३ बाद १६३ धावात रोखले. प्रत्युत्तरात रॉस टेलर (५३ धावा, ४७ चेंडू) आणि टिम सीफर्टच्या (५० धावा, ३० चेंडू) यांच्या जोरावर यजमान १२.३ षटकांत ३ बाद ११६ अशा चांगल्या स्थितीत होते, पण यानंतर चित्र पालटल्याने त्यांना ९ बाद १५६ धावा करता आल्या.
त्याआधी, विराट कोहलीला विश्रांती मिळाल्याने भारतााचे नेतृत्व करीत असलेल्या रोहित शर्माने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्याने लोकेश राहुलसह (४५ धावा, ३३ चेंडू) दुसºया गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने ३१ चेंडूंत नाबाद ३३ धावांचे योगदान दिले. फलंदाजी करताना दुखापत झाल्याने रोहित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही व त्यामुळे संघाचे नेतृत्व केले राहुलने. यावेळी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखविली. बुमराह (३/१२), नवदीप सैनी (२/२३) व शार्दुल ठाकूर (२/३८) यांनी भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे दहाव्या षटकात शिवम दुबेने एका षटकात ३४ धावा बहाल केल्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. एका षटकात ३० पेक्षा अधिक धावा बहाल केल्यानंतरही विजय नोंदविणारा भारत पहिला संघ ठरला. बुमराहने आपल्या पहिल्या षटकात मार्टिन गुप्टिलला (२) पायचित केले, तर वॉशिंग्टन सुंदरने पुढच्या षटकात कोलिन मुन्रोला (१५) त्रिफळाचीत केले. टॉम ब्रुस धावबाद झाल्याने यजमानांची ३ बाद १७ अशी अवस्था झाली. पण, टेलर व सीफर्ट यांनी संघाला सावरले. दोघांनी १० व्या षटकात दुबेला चार षटकार व दोन चौकारांच्या मदतीने ३४ धावांचा चोप दिला. टी२० क्रिकेटमध्ये हे दुसरे महागडे षटक ठरले.
३ बाद ११६ अशी स्थिती असताना किवी संघ लक्ष्याकडे सहज वाटचाल करीत होता. पण सीफर्टने अर्धशतक झाल्यानंतर नवदीप सैनीच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार व ३ षटकार मारले. बुमराहने डॅरिल मिशेलचा त्रिफळा उडवला. मिशेल सँटनर (६) व स्कॉट कुगलीन (०) यांना ठाकूरने बाद केले. टेलर सैनीच्या बाहेर जाणाºया चेंडूवर यष्टिरक्षक राहुलकडे झेल देत माघारी परतला आणि येथेच किवी संघ दडपणाखाली आला. ईश सोढीने (नाबाद १६) दोन षटकार मारले, पण पुरेसे ठरले नाही.
तत्पूर्वी, स्कॉट कुगलीन (२/२५) व हामिश बेनेट (१/२१) यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. राहुल बाद झाल्यानंतर भारताने लय गमावली, तर त्यानंतर रोहित स्नायू दुखापतीमुळे तंबूत परतला. त्यानंतर भारताने अखेरच्या २० चेंडूंवर केवळ २५ धावा केल्या. अय्यरने १२ व्या षटकात साऊदी व मिशेल सँटनरला षटकार मारले, पण डेथ ओव्हर्समध्ये त्याला अपेक्षित वेग राखता आला नाही.
डावाची सुरुवात करणाºया संजू सॅमसनला (२) पुन्हा अपयशी ठरला. राहुलने न्यूझीलंडचा प्रभारी कर्णधार साऊदीच्या षटकात षटकार व दोन चौकार मारले व त्यानंतर कुगलीनला शानदार षटकार मारला. रोहितने सँटनर व ईश सोढी यांना सहज षटकार मारले. त्याने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी साऊदीला चौकार मारत ३५ चेंडूंत २१वे अर्धशतक पूर्ण केले.
रोहितची दुखापत गंभीर नाही!
फलंदाजी करताना स्नायू दुखावल्याने मैदानाबाहेर गेलेल्या रोहित शर्माची दुखापत गंभीर नसल्याची माहिती लोकेश राहुलने दिली. तो म्हणाला, ‘रोहितची दुखापत गंभीर नसून तो ठीक आहे. काही दिवसांत तो तंदुरुस्त झाला पाहिजे.’ बीसीसीआयकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सध्या रोहितच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत.
संक्षिप्त धावफलक : भारत : २० षटकांत ३ बाद १६३ धावा (रोहित शर्मा ६०, लोकेश राहुल ४५, श्रेयस अय्यर नाबाद ३३; स्कॉट कुगलीन २/२५.) वि.वि. न्यूझीलंड : २० षटकांत ९ बाद १५९ धावा (रॉस टेलर ५३, टिम सीफर्ट ५०; जसप्रीत बुमराह ३/१२, नवदीप सैनी २/२३, शार्दुल ठाकूर २/३८).