चेन्नई : येथे आज, रविवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारतच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध सलग दहावी द्विपक्षीय मालिका जिंकण्याकडे कोहली आणि कंपनीची नजर असेल.सलामीचा रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यासह कर्णधार कोहलीच्या शानदार फलंदाजीच्या बळावर टी-२० मालिका जिंकल्यानंतर वन-डे मालिकेतही सलामीची जबाबदारी रोहित-राहुल यांच्याकडेच दिली जाईल. श्रेयस अय्यर देखील संधीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरल्यामुळे त्याला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळू शकते.
चेन्नईच्या याच मैदानावर टीम इंडियाने विजय शंकर आणि अंबाती रायुडू यांना संधी दिली. दोघेही संघात स्थान पक्के करू शकले नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून अपयशी ठरलेला यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या कामगिरीकडेही नजर असेल.युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकी जोडीला चेन्नईच्या खेळपट्टीवर एकत्र संधी मिळेल का, याकडेही जाणकारांचे लक्ष आहे. अनुभवी मोहम्मद शमी आणि दीपक चाहर या नियमित वेगवान गोलंदाजांना विंडीजच्या ‘हिटर्स’चा सामना करावा लागणार आहे.
विंडीज संघ एव्हिन लुईस याला वन-डे संघात स्थान देण्याच्या विचारात आहे. तथापि, मुंबईत जखमी झालेल्या लुईसच्या दुखापतीचे सामन्याआधी आकलन केले जाईल. आक्रमक फटके मारणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांना विकेट सांभाळून खेळावे लागेल, अन्यथा अखेरच्या काही षटकात वेगवान धावा काढणे कठीण होईल. शिमरोन हेटमायर, निकोलस पूरन, अष्टपैलू रोस्टन चेसल, कर्णधार कीरॉन पोलार्ड यांच्यावर धावा काढण्याची, तर शेल्डन कोटरेल, हेडन वॉल्श या गोलंदाजांवर भारताच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)भुवनेश्वरऐवजी शार्दुल ठाकूरभारताला मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीचा शिखर धवन यांची उणीव जाणवणार आहे. दोघेही जखमी झाल्याने संघाबाहेर आहेत. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला भुवनेश्वरच्या जागी संघात घेण्यात आले आहे. धवनची जागा घेणारा मयांक अग्रवाल यालादेखील वन-डे मालिकेत खेळण्याची संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तमिळनाडूविरुद्ध रणजी सामन्यात दमदार कामगिरीनंतर त्याला संघात घेण्यात आले होते.पावसाची शक्यतामागील २४ तासांत येथे पाऊस सुरू असल्याने उभय संघांचे लक्ष हवामानाकडे असेल. रात्रभर झालेल्या पावसामुळे मैदान निसरडे झाले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा सरावदेखील रद्द करण्यात आला.उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.वेस्ट इंडिज : कीरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अंबरीश, शाय होप, केरी पियरे, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कोटरेल, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वाल्श ज्युनियर.