नवी दिल्ली : भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जात असून, सर्व खेळाडू आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन जाऊ शकतात. सपोर्ट स्टाफला देखील हा नियम लागू असणार आहे. या दीर्घ दौऱ्यात कोरोनामुळे जैव सुरक्षित वातावरणात खेळाडूंना राहावे लागेल. अशावेळी कुटुंबीयांना सोबत नेण्याची विनंती बीसीसीआयने केली होती. ब्रिटिश सरकारने ती मंगळवारी मान्य केली.
दुसरीकडे कोरोना क्वारंटाईन नियमामुळे सौरव गांगुलीसह बीसीसीआयचा कोणताही पदाधिकारी न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी ब्रिटनमध्ये जाणार नाही. सूत्रानुसार सर्व खेळाडूंना कुटुंबाला सोबत नेण्याची परवानगी असेल. महिला खेळाडू देखील आपल्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकतील. खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी हे आवश्यक असल्याचे बीसीसीआयला वाटते.
महिला संघाचा इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना ब्रिस्टल येथे होईल. साऊथम्प्टनमधील एजेस बाऊल येथे क्वारंटाईन कालावधीनंतर २४ सदस्यांचा पुरुष संघ आपसात तीन सराव सामने खेळणार आहे.
पुरुष संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी, तर महिला क्रिकेट संघ एक कसोटी आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. दोन्ही संघ आज, बुधवारी रवाना होतील. ३ जून रोजी हे सर्वजण लंडनमध्ये उतरतील. तेथून दोन्ही संघ साऊथम्प्टनला जातील आणि तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतील.
Web Title: India players families given clearance for England tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.