India Tour of South Africa: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) विश्रांती दिली गेली. बीसीसीआयनं तो दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले, परंतु तोच अजिंक्य ड्रिंक्स ब्रेक्समध्ये भारतीय फलंदाजांसाठी पाणी घेऊन आलेला दिसला. त्यामुळे त्याच्या दुखापतीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यात आता अजिंक्यकडून उप कर्णधारपदही जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. अजिंक्य मागील बऱ्याच काळापासून फॉर्माशी झगडताना दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होईल आणि त्यात कसोटी संघाचे उप कर्णधारपद अजिंक्यच्या हातून काढून घेतलं जाईल.
ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण, काल झालेल्या AGM बैठकीत बीसीसीआयनं हा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) सोपवले गेले आणि आता कसोटी संघाचे उप कर्णधार पदही त्याच्याकडे सोपवले जाईल, असे वृत्त InsideSportनं दिलं आहे.
३४ वर्षीय अजिंक्य सातत्यानं अपयशी ठरतोय. मागील १६ कसोटीत त्याला एकच शतक झळकावता आले आहे आणि त्याची सरासरी ५१.३७ वरून ३९.६० अशी घसरली आहे. २०२०त त्यानं ४ कसोटीत ३८.८६च्या सरासरीनं २७२ धावा केल्या, तर २०२१मध्ये १२ कसोटीत २०.३५च्या सरासरीनं ४०७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यानं दोन डावांत अनुक्रमे ३५ व ४ धावाच केल्या.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी येत्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यांना आता केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ ९ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार होता, परंतु आता मालिकेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. सरकारनं या दौऱ्याला परवानगी दिल्यास या दौऱ्याची सुरुवात १७ डिसेंबरऐवजी २६ डिसेंबरला होईल. म्हणजे दौरा ९-१० दिवस उशिरानं सुरू होईल.