दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी वनडे आज
केपटाऊन : सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अपराजित आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान यजमानांपुढे असेल.
दक्षिण आफ्रिकेच्या निराशाजनक कामगिरीचे कारण बºयाच अंशी खेळाडूंच्या दुखापती आहे. एबी डिव्हिलियर्स पहिल्या एकदिवसीय लढतीपूर्वीच संघाबाहेर झाला, तर फाफ ड्युप्लेसिस दुसºया लढतीपूर्वी. या दोन्ही खेळाडूंच्या बोटाला दुखापत झाली आहे. याव्यतिरिक्त दुसºया सामन्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे तो मालिकेतून ‘बाद’ झाला. दक्षिण आफ्रिकेने डिकॉकचा पर्याय म्हणून कुणाचीही संघात निवड केलेली नाही. त्यामुळे हेन्रिक क्लासेनच्या पदार्पणाची शक्यता आहे. क्लासेन स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाºया फलंदाजांमध्ये तिसºया क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी डिकॉकचे बाहेर असणे काही अंशी दिलासा देणारी बाब आहे. कारण तो फॉर्मात नव्हता. भारताविरुद्ध कसोटी व एकदिवसीयमध्ये एकूण आठ डावांमध्ये त्याला एकदाही अर्धशतक गाठता आले नाही. क्लासेनला भारतीय फिरकीपटू यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना खेळण्याची संधी मिळालेली नाही. संधी मिळाल्यास क्लासेन हाशिम अमलासह संघाला चांगली सुरुवात करून देईल, अशी दक्षिण आफ्रिकेला आशा आहे.
डिकॉक व अमला यांनी डर्बन व सेंच्युरियन येथे पहिल्या दोन सामन्यांत सलामीला अनुक्रमे ३० व ३९ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर उर्वरित फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरले होते. पहिल्या लढतीत केवळ ड्युप्लेसिने संयमी खेळी करीत शतक झळकावले होते. कर्णधार ऐडन मार्करम डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. यापूर्वी डर्बनमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने ९ व सेंच्युरियनमध्ये तिसºया क्रमांकावर खेळताना ८ धावा केल्या होत्या. मधली फळी मजबूत करण्यासाठी अनुभवी फलंदाज फरहान बेहरदीनला अंतिम संघात स्थान मिळू शकते. अशा स्थितीत खायेलिहले जोंडोला बाहेर बसावे लागेल.
दुसरीकडे भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत वर्चस्व राखल्याने खूश आहे. कर्णधार विराट कोहली यावेळी सलग तिसºया एकदिवसीयमध्ये संघ कायम राखण्याची शक्यता आहे. भारताची नजर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत तीन सामने जिंकून इतिहास नोंदविण्यावर केंद्रित झाली आहे. जर असे घडले तर येथे भारताचा १९९२नंतर पाच सामन्यांतील तिसरा विजय ठरेल.
>आमच्याकडे खूप अनुभव आहे. संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असून हे खूप चांगले आहे. युवा खेळाडूही खूप अनुभवी असल्याप्रमाणे दमदार खेळ करत आहेत आणि ही आमची ताकद आहे. हार्दिक पांड्यामुळे संघ समतोल असून त्याच्यामुळे आम्ही फिरकी गोलंदाजांना उशीराने गोलंदाजी देऊ शकतो. हे आमच्यासाठी विशेष आहे.- शिखर धवन, फलंदाज - भारत
>आम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकदा जेव्हा खराब खेळ केला जातो तेव्हा आपण अडचणींतून जात असल्यासारखे भासते. त्यामुळे सकारात्मक मानसिकतेने खेळण्याचे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खेळामध्ये काहीही होऊ शकते. आम्हाला विजयी लय मिळवावी लागेल. आम्ही अद्याप मालिकेतून बाहेर पडलेलो नाही.- कागिसो रबाडा, वेगवान गोलंदाज - दक्षिण आफ्रिका
>दक्षिण आफ्रिकेतील अपयश मागे टाकण्याची संधी
भारताने डर्बन व सेंच्युरियन येथे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत अनुक्रमे ६ व ९ गडी राखून सहज विजय मिळवत यजमान संघावर वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेत द्विपक्षीय मालिकेत यापूर्वी भारतीय संघाला कधीच दोनपेक्षा अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही.१९९२मध्ये सात सामन्यांची मालिका २-५ने गमावली होती, तर २०१०-११मध्ये भारताने २-१ने आघाडी घेतल्यानंतर पाच सामन्यांची मालिका २-३ने गमावली होती. पण सध्याच्या भारतीय संघाचा दर्जा बघता इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तर टीम इंडियासाठी त्रासदायक ठरेल.
>प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व शार्दुल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम (कर्णधार), हाशिम अमला, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्ने मोर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायेलिहले जोंडो, फरहान बेहरदीन आणि हेन्रिक क्लासेन.
सेंच्युरियन विजयानंतर भारताने आयसीसी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे आणि केपटाऊनमध्ये विजय मिळवला तर भारत मानांकन गुणांमध्ये आघाडी घेईल. दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला तर भारताची दुसºया स्थानावर घसरण होईल. संघ व्यवस्थापनाने मानांकनाला अधिक महत्त्व देत नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. पण कोहली अॅण्ड कंपनी मात्र अव्वल स्थान कायम राखण्यास उत्सुक असेल.