भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्या डावात शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा दुसरा डाव सारवला होता. पण मोक्याच्या क्षणी विराट बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. पण विराट बाद झाला असला तरी भारताने सामन्यावर चांगली पकड बनवली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण 166 धावांची आघाडी आहे. पुजारा तिसऱ्या दिवशी नाबाद असून त्याने 127 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 40 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे काही वेळ वाया गेला. पण भारताच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत ऑस्ट्रेलियाचे आघाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. ट्रेव्हिस हेडने एकाकी झुंज देत सहा चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली. हेडच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 235 धावा करता आल्या.
भारताचे सलामीवीर 15 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरले. पहिल्या डावाच्या तुलनेत भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी बरी कामगिरी केली, पण या दोघांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आहे. पण तरीही या दोघांनी 63 धावांची सलामी दिली. यानंतर फक्त 13 धावांच्या फरकामध्ये हे दोघेही तंबूत परतले. भारतासाठी हे दोन धक्के होते. पण पुजारा आणि कोहली यांनी हे धक्के पचवत सकारात्मक फलंदाजी केली.
कोहली आणि पुजारा यांनी दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने कोहलीचा काढला. कोहलीने 104 चेंडूंत 3 चौकारांच्या जोरावर 34 धावा केल्या. कोहली बाद झाला असला तरी पुजाराने अखेरपर्यंत किल्ला लढवत पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजीचा नजारा पेश केला.