भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातील नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूनं लागला. या सामन्यात शिखर धवन 96 धावांवर माघारी परतला, तर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा विराट हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मागच्या सामन्यातील चुका सुधारताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. पण, रोहित 44 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. अॅडम झम्पानं त्याला 14व्या षटकात पायचीत केले. रोहितनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण, DRS मध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताला पहिला धक्का दिला.
भारतीय संघाला 81 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिखरनं या मालिकेतील सलग दुसरी अर्धशतकी खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. शिखर तुफान फटकेबाजी करत होता. पण, 96 धावांवर त्यानं विकेट फेकली. त्याच्या बाद होण्यावर कोहलीनंही नाराजी प्रकट केली. धवन आणि विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. शिखर 90 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 96 धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर 7 धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
विराटनं 56 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटनं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली. या सामन्यात विराटनं 76 चेंडूंत 6 चौकारांसह 78 धावा केल्या. या खेळीसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा त्याने पूर्ण केल्या. त्यानं 86 डावांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. सचिननं 144 डावांत 6707 धावा केल्या आहेत.