India vs Australia, 4th Test Day 4 : ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shradul Thakur) यांनी मदत करणाऱ्या खेळपट्टीवर दबदबा गाजवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले.
चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले. २५व्या षटकात शार्दूलनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मार्कस हॅरीसला ( ३८) त्यानं बाद केलं. पुढच्याच षटकात वॉशिंग्टननं डेव्हिड वॉर्नरला ( ४८) पायचीत केलं. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन आक्रमक खेळ करताना दिसले आणि अजिंक्य रहाणेनं त्यांना रोखण्यासाठी मोहम्मद सिराजला पुन्हा गोलंदाजीला बोलावले. अजिंक्यची ही चाल यशस्वी ठरली आणि सिराजनं एकाच षटकात लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना माघारी पाठवले.
मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियाला आता विजयासाठी कराव्या लागतील ३२८ धावा.