India vs Australia, 4th Test Day 4 : तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथची ( Steve Smith) शॅडो फलंदाजी खूप चर्चेत आली होती. रिषभ पंत ऑसी गोलंदाजांची धुलाई करत असताना स्मिथनं चिटींग केल्याची चर्चा रंगली. स्मिथनं क्रीजवरील गार्ड मार्क पुसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आजी-माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीकाही केली. ऑसी कर्णधार टीम पेन यानं मात्र सामन्यानंतर स्मिथचा बचाव केला. आता चौथ्या कसोटीत शॅडो फलंदाजीचा प्रकार पुन्हा घडला, परंतु यावेळी तशी फलंदाजी करणारा खेळाडू हा रोहित शर्मा ( Rohit Sharma) होता. विशेष बाब म्हणजे स्मिथच्या डोळ्यादेखत रोहित शॅडो फलंदाजी करताना दिसला. स्मिथही त्याच्याकडे पाहत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले. २५व्या षटकात शार्दूलनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मार्कस हॅरीसला ( ३८) त्यानं बाद केलं. पुढच्याच षटकात वॉशिंग्टननं डेव्हिड वॉर्नरला ( ४८) पायचीत केलं.
स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन आक्रमक खेळ करताना दिसले आणि अजिंक्य रहाणेनं त्यांना रोखण्यासाठी मोहम्मद सिराजला पुन्हा गोलंदाजीला बोलावले. अजिंक्यची ही चाल यशस्वी ठरली आणि सिराजनं एकाच षटकात लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना माघारी पाठवले. लंच ब्रेक झाला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ४ बाद १४९ धावा करून १८२ धावांची आघाडी घेतली आहे.
पाहा व्हिडीओ...