India vs Australia : टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गचाळ क्षेत्ररक्षण, आघाडीच्या फलंदाजांचे अपयश आणि गोलंदाजांची झालेली धुलाई टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरली. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना आणखी एक दणका बसला आणि त्यांना दंड भरावा लागला.
फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था ४ बाद १०१ धावा अशी झाली होती. पण, हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावा जोडल्या. धवन ७४ धावांवर माघारी परतला. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार खेचून ९० धावांवर बाद झाला. अॅडम झम्पानं ५४ धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनं ५३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या.
या सामन्यातील पहिला डाव संपण्यासाठी चार तासांहून अधिक कालावधी लागला. त्यामुळे भारतीय संघाला षटकांची गती संथ ठेवल्यामुळे मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली. आयसीसीच्या मॅच रेफरींच्या एलिट पॅनलचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी ही शिक्षा सुनावली. ICC Code of Conduct च्या २.२२च्या कलमनुसार ही शिक्षा सुनावली आहे.