सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मे-जूनमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाच्या वन डे मालिकेकडे पाहिले जात आहेत. ही मालिका आणि त्यानंतरचा न्यूझीलंड दौरा यात भारतीय संघाला आपल्या फलंदाजांचा क्रम निश्चित करावा लागणार आहे. त्यामुळे या मालिकांमधील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाला महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीला कारणीभूत ठरवले जात आहे. धोनीने 96 चेंडूंत 51 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याच्या फॉर्मविषयी चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या वन डेत शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माने मात्र धोनीची पाठराखण केली आहे. तो म्हणाला,''धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे, संघाच्या फायद्याचे आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. या क्रमांकावर फलंदाजीसाठी आमच्याकडे अंबाती रायुडू आहे आणि तो चांगली कामगिरी कर आहे. मात्र, अंतिम निर्णय हा कर्णधार आणि प्रशिक्षक यांचा असतो. वैयक्तिक मत विचाराल, तर धोनीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मला आवडेल.''
कोहलीने मात्र यापूर्वी वेगळे मत मांडले होते. त्याने चौथ्या क्रमांकासाठी रायुडूच योग्य असल्याचे सांगितले होते. रोहित पुढे म्हणाला,''धोनीच्या कारकिर्दीतील एकूण आकडेवारीवर नजर टाकल्यास त्याने 90च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आजची परिस्थिती भिन्न होती. तो फलंदाजीला आला त्यावेळी आमचे तीन फलंदाज झटपट माघारी गेले होते आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज चांगली कामगिरी करत होते. अशावेळी शतकी भागीदारी करणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही खेळपट्टीवर टिकून खेळण्याचा निर्णय घेतला. मलाही जलद धावा करता आल्या नाहीत.''