मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातील मैत्रीपूर्ण नातं जगजाहीर आहे आणि त्याची प्रचिती अनेक घटनांतून आलीही आहे. अॅडलेड वन डे सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली आणि आता वन डे मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. भारतीय संघाच्या या यशाचं श्रेय कोहलीने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले आहे. माजी क्रिकेटपटू शास्त्री यांनी कधी माझ्या शैलीत बदल करण्याचा प्रयत्न केला नाही, असेही 30 वर्षीय कोहली म्हणाला.
तो म्हणाला,''शास्त्री यांनी अनेक सामन्यांचे समालोचन केले आहे. त्यांनी अनेक सामने पाहिले आहेत आणि त्यांच्याकडे अनेक सामन्यांत खेळण्याचा अनुभवही आहे. त्यामुळे त्यांना नक्की माहित आहे की सामन्याची परिस्थिती कशी हाताळायची. त्यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन होत राहते आणि त्यामुळे मला प्रचंड मदत मिळते. त्यांनी कधीच माझ्या खेळात हस्तक्षेप किंवा बदल करण्याचा प्रयत्न केला नाही.''
कोहलीनं भविष्यातील आपले स्वप्नही सांगितले. तो म्हणाला,''कसोटी क्रिकेटमध्ये मला भारताला महासत्ता बनवायचे आहे. मी याला लक्ष्य म्हणणार नाही, परंतु हे माझे स्वप्न आहे.'' दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार कोहलीने वन डे कारकिर्दीतील 39वे शतक झळकावले आणि भारताला सहा विकेट राखून विजय मिळवून दिला. त्याला महेंद्रसिंग धोनीने नाबाद 55 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना शुक्रवारी होणार आहे.