बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : रोहित शर्माचे शतक आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
रोहितच्या शतकानंतर भारताची भंबेरी
रोहित शर्माच्या शतकानंतर भारताची बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. रोहित फलंदाजी करत असताना भारतीय संघ चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताला साडे तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पण भक्कम पायाच्या जोरावर भारताला बांगलादेशपुढे 315 धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अचूक असल्याचे रोहितने दाखवून दिले. रोहितला यावेळी लोकेश राहुलचीही चांगली साथ मिळाली. रोहित आणि लोकेश या दोघांनी मिळून 29.2 षटकांत 180 धावांची सलामी दिली. रोहितने यावेळी विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. पण गेल्या सामन्यासारखेच रोहितला शतकानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 104 धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर काही वेळात राहुलही बाद झाला. राहुलने सहा चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर 77 धावा केल्या. या दोघांनंतर एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. रिषभ पंतने 48 धावांची खेळी साकारली, पण यावेळीही तो बेजबाबदारपणे बाद झाला.
विश्वचषकात रोहित 'टॉप'वर; चौथ्या शतकसह गाठले शिखर
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्मा विश्वचषकात 'टॉप'वर पोहोचला आहे. या खेळीनंतर रोहित विश्वचषकातील शिखरावर पोहोचला आहे. या सामन्यात रोहितने काही विक्रम रचत असताना ही दमदार कामगिरीही केली आहे.
यंदाच्या विश्वचषकातील रोहितचे हे चौथे शतक ठरले. त्याचबरोबर रोहितने एक अर्धशतकही झळकावले आहे. या सामन्यातील शतकासह रोहितने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर या विश्वचषकात सर्वाधिक 544 धावा झाल्या आहेत. हा अव्वल क्रमांक पटकावताना रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर टाकले आहे.
Web Title: India vs Bangladesh, Latest News: India beat Bangladesh and enter in semi-finals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.