बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : आयसीसी क्रिकेट विश्वचषकामध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत बांगलादेशवर 28 धावांनी मात करत भारतीय संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शानदार शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आणि भेदक गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमरा हे या विजयाचे हिरो ठरले आहेत. मात्र शेवटच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा कासवछाप खेळी केल्याने महेंद्र सिंह धोनी व्हिलन ठरला असून, त्याच्या बचावात्मक खेळावर क्रिकेटप्रेमींकडून सोशल मीडियावर टीका होत आहे.
मंगळवारी झालेल्या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी धडाकेबाज फलंदाजी करत हा निर्णय सार्थ ठरवला होता. रोहितने शानदार शतक तर लोकेश राहुलने 77 धावांची खेळी करून संघाला 180 धावांची सलामी दिली. त्यानंतर ऋषभ पंत याने 48 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करून दिली. मात्र शेवटच्या षटकांमध्ये धोनीने पुन्हा एकदा सावध खेळ केला. त्याने 33 चेंडून 35 धावांची बचावात्मक खेळी केल्याने भारताचे सव्वा तीनशेहून अधिक धावा फटकावण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
धोनीच्या या कासवछाप खेळीनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनेक क्रिकेटप्रेमींनी धोनीच्या अतिबचावात्मक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अखेरीस गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा चिवट प्रतिकार मोडून भारतीय संघाला विजय मिळवता आला.
Web Title: India Vs Bangladesh, Latest News : Rohit, Bumrah, Hero of victory in Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.