ललित झांबरे : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माचा रो'हिट' शो सुपरहिट ठरतोय. विश्वचषक 19 मध्ये सातच डावातील आपले चौथे शतक त्याने झळकावले आहे. आणि या शतकांदरम्यान त्याने वन डे शतकांची एक अनोखी हॅट्रिक साधली आहे. ती म्हणजे एकाच मैदानावर लागोपाठ तिसरे शतक करण्याची. बर्मिंगहमच्या एजबस्टन मैदानावर बांग्लादेशविरुध्दच्या त्याच्या आजच्या 104 धावा ही या मैदानावरची त्याची लागोपाठ तिसरी शतकी खेळी आहे. एजबस्टनवर अशी हॅट्रिक करणारा तो एकमेव आहे.
या मैदानावर 2017 मध्ये त्याने बांगलादेशविरुध्द नाबाद 123 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता इंग्लंडविरुध्द 102 धावा केल्यावर पुन्हा बांगलादेशविरुध्दच त्याने 104 धावांची खेळी केली आहे. यासह त्याने एजबस्टनवरील शतकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे.
एकाच मैदानावर लागोपाठ तीन वन डे शतक करणारा तो दुसरा भारतीय आहे. विराट कोहलीच्या नावावर कोलंबो येथे वन डे शतकांची अशीच हॅट्रिक आहे. विराटने प्रेमदासा स्टेडियमवर 128 (2012), 131 (2017) व 110 (2017) धावांच्या खेळी केल्या होत्या.
इतिहास रचण्यापासून रोहित फक्त एक पाऊल दूर...भारताचा सलामीवीर रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या संघाविरुद्ध शतक झळकावले. रोहितचे हे विश्वचषकातील चौथे शतक ठरले. पण आता विश्वचषकात इतिहास रचण्यासाठी रोहित फक्त एक पाऊल दूर आहे.
एका विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक शतकांचा विक्रम श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या नावावर आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषकात संगकाराने चार शतके झळकावली होती. रोहितनेही या विश्वचषकात चार शतक झळकावत संगकाराशी बरोबरी केली आहे. आता पुढील सामन्यात जर रोहितने शतक झळकावले तर तो इतिहास रचू शकतो.
रोहित शर्माच्या शतकानंतर भारताची बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. रोहित फलंदाजी करत असताना भारतीय संघ चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताला साडे तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पण भक्कम पायाच्या जोरावर भारताला बांगलादेशपुढे 315 धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अचूक असल्याचे रोहितने दाखवून दिले. रोहितला यावेळी लोकेश राहुलचीही चांगली साथ मिळाली. रोहित आणि लोकेश या दोघांनी मिळून 29.2 षटकांत 180 धावांची सलामी दिली. रोहितने यावेळी विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. पण गेल्या सामन्यासारखेच रोहितला शतकानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 104 धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर काही वेळात राहुलही बाद झाला. राहुलने सहा चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर 77 धावा केल्या. या दोघांनंतर एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. रिषभ पंतने 48 धावांची खेळी साकारली, पण यावेळीही तो बेजबाबदारपणे बाद झाला.