लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळावर सध्या सडकून टीका होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीला अखेरच्या षटकांत साजेशी खेळी करता आली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचा पूर वाहू लागला आहे. धोनीनं कालच्या सामन्यात 33 चेंडूंत 35 धावा केल्या. त्याच्या या संथ खेळीमुळेच भारताला केवळ 314 धावांपेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. पण, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर माहीच्या मदतीला धावला आहे.
अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीचा संथ खेळ पाहायला मिळाला होता. चाहत्यांकडून धोनीची हूर्योही उडवण्यात आली होती. शिवाय नासेर हुसेन आणि सौरव गांगुली यांनीही धोनीच्या खेळाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. तेंडुलकरनेही धोनी व केदार जाधव यांच्या खेळण्याच्या शैलीवर नाराजी प्रकट केली होती. त्यावरून त्याला धोनी समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
तेंडुलकर म्हणाला होता की,'' अफगाणिस्ताविरुद्धच्या कामगिरीवर मी थोडासा निराश आहे, यापेक्षा चांगली कामगिरी करता आली असती. केदार जाधव व धोनी यांच्या भागीदारीवरही मी निराश आहे. ते खूप संथ खेळले. आपण फिरकीपटूंची 34 षटकं खेळलो आणि त्यात केवळ 119 धावा केल्या.''
पण, बांगलादेशविरुद्घच्या सामन्यानंतर तेंडुलकर म्हणाला,''मला वाटतं ती महत्त्वाची खेळी होती आणि संघाला जशा खेळीची गरज होती, धोनी तसाच खेळला. तो 50 षटकं खेळपट्टीवर टिकून राहिला, तर इतर फलंदाजांवरील दडपण कमी होतं. त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि तो तेच करतोय. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.''
रोहित, बुमराहचं कौतुक, तर क्रिकेटप्रेमींसाठी धोनी पुन्हा ठरला व्हिलन धोनीच्या कासवछाप खेळीनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनेक क्रिकेटप्रेमींनी धोनीच्या अतिबचावात्मक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अखेरीस गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा चिवट प्रतिकार मोडून भारतीय संघाला विजय मिळवता आला.