बर्मिंगहॅम : मैदानात एखाद्या खेळाडूने जर काही चूक केली तर कर्णधार विराट कोहलीच्या शिव्या त्याला ऐकायला लागत होत्या. पण आता हाच कोहली बदलला आहे. शिव्या देऊन चांगली कामगिरी करवून घेता येत नाही, हे कोहलीला कुठेतरी पटलेले दिसते. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान एक गोष्ट अशी घडली की कोहली आता वैतागणार आणि शिव्या देणार असे वाटत होते, पण तसे मात्र घडले नाही.
इंग्लंडच्या डावातील सहावे षटक. इशांत शर्मा इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या भेदक माऱ्याने सतावत होता. पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर किअॅटन जेनिंग्स चांगलाच चकला. त्याच चेंडूने जेनिंग्सच्या बॅटची कडा घेतली आणि स्लीपच्या दिशेने तो चेंडू गेला. चौथ्या स्लीपमध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेच्या हातून तो झेल सुटला. त्यावेळी त्याच्या बाजूला तिसऱ्या स्लीपमध्ये कोहलीच उभा होता. अजिंक्यकडून झेल सुटला. त्याने कोहलीकडे पाहिले. आता कोहली काय बोलणार, याचा अंदाज अजिंक्य लावत होता. पण कोहली यावेळी काहीच बोलला नाही. त्याने फक्त अजिंक्यकडे पाहिले आणि पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी तो सज्ज झाला.