चेन्नई : कर्णधार ज्यो रुटने शानदार फॉर्म कायम राखताना आपल्या १०० व्या कसोटीत शतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याच्या जोरावर पाहुण्या इग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ३ बाद २६३ धावांची मजल मारत विशाल धावसंख्या उभारण्याची मजबूत पायाभरणी केली.श्रीलंका दौऱ्यात दोन्ही कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा रुट १२८ धावांवर खेळत आहे. त्याने सलामीवीर फलंदाज डॉम सिब्ले (८७) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात दोन बळी घेतले. त्यानंतर रुटच्या स्ट्रोकफुल व सिब्लेच्या संयमी खेळीपुढे यजमान संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह खेळला, पण केवळ रविचंद्रन अश्विनला काहीअंशी छाप सोडता आली. वाॅशिंग्टन सुंदर व शाहबाज नदीम साधारण गोलंदाज भासले. त्यामुळे डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले.रुटने १९७ चेंडूंना सामोेरे जाताना १४ चौकार व १ षटकार लगावला. भारतात आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेला जसप्रीत बुमराह आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने दिवसाच्या अखेरच्या षटकात सिब्लेला पायचित करीत भारताला तिसरे यश मिळवून दिले. सिब्लेने डीआरएसचा अवलंब केला, पण त्याचा त्याला लाभ झाला नाही. बुमराहने ४० धावांत दोन बळी घेतले तर अश्विनने ६८ धावांत एक बळी मिळविला.खेळपट्टीचे स्वरूप बघता रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. रोरी बर्न्स (३३) याने बुमराहच्या पहिल्या चेंडूवर ऋषभ पंतकडून जीवदान मिळाल्यानंतर संघाला चांगली सुरुवात करून दिली. सिब्ले व त्याने सलामीला ६३ धावांची भागीदारी केली. बर्न्स अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. लॉरेंसला खाते उघडण्यापूर्वीच बुमराहने पायचित करीत तंबूचा मार्ग दाखिवला. ईशांत शर्माने चांगला मारा केला, पण त्याला यश आले नाही.
...आणि रुट सहकाऱ्यांची नावे विसरलानाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने फलंदाजीचा निर्णय घेतला. समालोचक मुरली कार्तिक याने त्याला अन्य प्रश्नांसह संघात काय बदल आहेत, याबाबत प्रश्न करताच रुट गोंधळला. काही वेळ काय बोलावे हेच त्याचा सूचेना. अखेर तो मुरलीला म्हणाला,‘ तुम्हाला मी यादी दिली आहे, आपण नावे पाहू शकता. कदाचित शंभरावा सामना खेळण्याच्या उत्साहात तो आपल्या सहकाऱ्यांची नावे विसरला असावा. त्याचवेळी मुरलीने भारताचा कर्णधार विराट कोहली याला हाच प्रश्न केला तेव्हा कोहलीने मात्र लगेच संघात केलेल्या बदलाची माहिती दिली.
६०० ते ७०० धावांचा डोंगर उभारू इच्छितो - ज्यो रुटचेन्नई : ‘आमचा संघ पहिल्या डावात ६०० ते ७०० धावांचा डोंगर उभारु इच्छितो,’ असे मत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने व्यक्त केले. भारताविरुद्ध पहिल्याच दिवशी शंभराव्या कसोटीत नाबाद १२८ धावांची खेळी करणारा रुट म्हणाला,‘ मांसपेशीचे दुखणी उमळले तेव्हा विराट कोहलीने मला मदत केली. यामुळे त्याची खेळभावना अधोरेखित झाली आहे. त्याचवेळी वेगवान आणि फिरकीपटूंच्या रिव्हर्स स्विंग चेंडूंना समर्थपणे तोंड दिले. दुसऱ्या दिवशी मोठी खेळी करण्यास सज्ज असेन. दीर्घकाळ फलंदाजी करण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. आम्ही उद्या दिवसभर किंवा तिसऱ्या दिवसाच्या सरुवातीला फलंदाजी करू शकलो तर आमच्या हिताचे ठरेल.त्यानंतर काय होईल, हे मात्र मी सांगू शकत नाही.’चेंडूची चकाकी कायम राखणे कठीण - बुमराहचेन्नई : आयसीसीने चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदी घातल्याने गोलंदाज पांगळे झाले असल्याचे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने शुक्रवारी व्यक्त केले. इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना बुमराह म्हणाला, ‘चेंडूला चकाकी आणण्यासाठी घामाचा वापर प्रभावी ठरत नाही. एसजी चेंडू ४० षटकांनंतर नरम झाला होता. खेळपट्टी पाटा असल्याने साथ लाभत नव्हती. धावफलकइंग्लंड पहिला डाव :- रोरी बर्न्स झे. पंत गो. अश्विन ३३, डोमनिक सिब्ले पायचित गो. बुमराह ८७, डॅनियल लॉरेंस पायचित गो. बुमराह ८७, ज्यो रुट खेळत आहे १२८. अवांतर (१५). एकूण ८९.३ षटकांत ३ बाद २६३. बाद क्रम : १-६३, २-६३, ३-२६३. गोलंदाजी : ईशांत १५-३-२७-०, बुमराह १८.३-२-४०-२, अश्विन २४-२-६८-१, नदीम २०-३-६९-०, सुंदर १२-०-५५-०.