लंडन : इंग्लंडविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर क्लीन स्वीप करेल, असे भाकीत इंग्लंडचा माजी फिरकीपटू मोंटी पानेसर याने शनिवारी केले.
पानेसर म्हणाला, ‘भारतीय संघ योग्यवेळी इंग्लंड दौरा करीत आहे. ऑगस्टमध्ये इंग्लंडचे हवामान उष्ण असते. अशावेळी सामन्यात दोन फिरकी गोलंदाज खेळल्यास इंग्लंडला दोन्ही डावात बाद करणे भारतासाठी कठीण जाणार नाही. पाचही सामन्यात हेच सूत्र राहिल्यास भारताचा विदेशात हा सर्वांत मोठा विजय ठरू शकेल.’ पानेसरआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने डब्ल्यूटीसी फायनल न्यूझीलंड जिंकेल, असे भाकीत केले आहे. २०१८ मध्ये भारताने इंग्लंड दौरा केला त्यावेळी १-३ ने पराभव पत्करावा लागला होता.
इंग्लंडमध्ये भारताने २००७ नंतर मालिका विजय मिळविलेला नाही. यंदा इंग्लंडला भारताने भारतात ३-१ ने पराभूत केले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्यास इंग्लंड संघ उत्सुक आहे. दुसरीकडे भारतीय संघातील रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीच्या जोरावर भारताला इंग्लंडमध्ये यंदा मालिका जिंकण्याची संधी असेल, असे पानेसरचे मत आहे.
Web Title: India VS England: India will sweep clean against England: Monty Panesar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.