भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरू आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेनंतर इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांनी एकदिवसीय मालिका देखील सुरू होणार आहे. पुण्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि अष्टपैलू कृणाल पंड्या (Krunal Pandya) यांची नावं जवळपास निश्चित समजली जात आहेत. (Prasidh Krishna, Krunal Pandya likely to receive ODI call-up)
नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडकमध्ये प्रसिद्ध कृष्णानं १४ विकेट्स घेतल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळताना आपण पाहिलं आहे. प्रसिद्ध कृष्णासोबतच मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, नुकताच लग्नाच्या बोहल्यावर चढलेला जसप्रीत बुमराह आणि दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा संघाबाहेरच राहण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमहारचं १५ मार्च रोजी लग्न झालं आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना आणि इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका खेळू शकलेला नाही. यानंतरच्या एकदिवसीय मालिकेतही तो सुटीवर असणार आहे.
कृणाल पंड्यानं याआधी भारतीय टी-२० संघातून पदार्पण केलं आहे. पण एकदिवसीय संघात त्याला आजवर संधी मिळू शकलेली नाही. विजय हजारे स्पर्धेत कृणाल पंड्यानंही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. कृणाल पंड्यानं या स्पर्धेत दोन नाबाद शतकं आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत.