लंडन - इंग्लंडने हजाराव्या कसोटी सामन्यात दिमाखात विजय मिळवला. भारतीय संघावर त्यांनी 31 धावांनी मात केली आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, पहिल्या कसोटीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बेन स्टोक्सला वगळण्यात आले आणि अपयशी डेवीड मलानलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यात जेम्स अँडरसनने स्वतःला दुखापत करून घेतल्याने दुस-या कसोटीत इंग्लंडच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एक दिवस आधीच पहिल्या कसोटीचा निकाल लागल्याने इंग्लंडच्या खेळाडूंनी रविवारची सुट्टी एंजॉय केली. इंग्लंडचे दोन दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी गोल्फ स्टीकवर हात आजमावले. मात्र, गोल्फ खेळताना अँडरसनचा चेह-याला दुखापत झाली. अँडरसनने मारलेल्या फटक्यानंतर चेंडू समोरील दगडावर आदळून माघारी फिरला आणि त्याच्याच चेह-यावर तुफान वेगाने आपटला. हा सर्व प्रकार ब्रॉडने कॅमेरात कैद केला आणि नंतर ट्विटरवर शेअर केला.