मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट : भारतीय महिला संघाने सोमवारी दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने ( 63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार मिताली राजने ( 47*) आणि पूनम राऊत (32) यांनीही उपयुक्त खेळी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड महिला संघाला 161 धावांवरच समाधान मानावे लागले. पहिल्या वन डे सामन्यातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील होता. मात्र, त्यांना संपूर्ण 50 षटकंही खेळता आली नाही. नॅटली स्किव्हर ( 85) हीने एकाकी झुंज दिली आणि त्यामुळे इंग्लंडला 161 धावांपर्यंत मजल मारता आली. झुलन गोस्वामी ( 4/30) आणि शिखा पांडे ( 4/18) या जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी खिळखिळीत केली. त्यांना पूनम यादवने ( 2/28) चांगली साथ दिली. भारतीय जलदगती गोलंदाजांनी एकूण 8 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच, प्रथमच भारताच्या दोन गोलंदाजांनी एका सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेत्या आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. त्यानंतर स्मृती मानधना व पूनम राऊत यांनी संघाला विजयासमीप आणले. पूनमने 65 चेंडूंत 4 चौकारांसह 32 धावा केल्या. स्मृतीने 74 चेंडूंत 63 धावा केल्या. त्यात 7 चौकार व 1 षटकार यांचा समावेश होता. स्मृतीचे हे 15 वे अर्धशतक ठरले. धावांचा पाठलाग करताना स्मृतीने 8 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना तिने 117.8च्या सरासरीनं 589 धावा चोपल्या आहेत.
त्यानंतर कर्णधार
मिताली राजने संयमी खेळ करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मितालीने 69 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं नाबाद 47 धावा केल्या. दिप्ती शर्मा 6 धावांवर नाबाद राहिली. भारतीय महिलांनी 41.1 षटकांत 162 धावांचे लक्ष्य पार केले.
Web Title: India vs England Women's: India win the 2nd ODI against England by 7 wickets to take a 2-0 lead in the 3-match series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.