India vs Ireland 1st T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात सहज विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत १२-१२ षटकांची खेळवण्यात आली आणि त्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सहज बाजी मारली. हॅरी टेक्टरने दमदार खेळ करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. पण, भारताच्या फलंदाजांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. इशान किशनने आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर अन्य फलंदाजांची चोख भूमिका बजावली. त्यानंतर दीपक हुडा व हार्दिक पांड्या यांनी सुरेख खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) फलंदाजीला न पाठवल्याने नेटिझन्स सवाल करत आहेत.
भुवनेश्वर कुमारने पाचव्या चेंडूवर अँडी बालबर्नीचा ( ०) त्रिफळा उडवला. दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेला पहिला चेंडू पॉल स्टर्लिंगने कव्हरच्या दिशेने सीमापार पाठवला. पुढचा चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला, परंतु दीपक हुडाने अलगद झेल घेतला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३४ विकेट्स घेण्याच विक्रम भुवीच्या नावे नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त गोलंदाजी करणारा आणि विकेट मिळवणारा हार्दिक हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला.
पदार्पणवीर उम्रान मलिकने ( Umran Malik) पहिल्या षटकात १४ धावा दिल्या. आयर्लंडच्या हॅरी टेक्टर ( Harry Tector) व लोर्कन टकर ( Lorcan Tucker) यांनी २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला टफ फाईट दिली. टकर ( १८) व टेक्टर यांची २९ चेंडूंतील ५० धावांची भागीदारी युजवेंद्र चहलने संपुष्टात आणली.चहलने त्याच्या ३ षटकांत ११ धावा देताना १ विकेट घेतली. भुवीनेही ३-१-१६-१ अशी कामगिरी केली. टेक्टरने ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. आयर्लंडनं ४ बाद १०८ धावा केल्या. हार्दिकने २-०-२६-१, आवेश खानने २-०-२२-१ अशी गोलंदाजी केली.
दीपक हुडा व इशान किशन ही जोडी सलामीला आली. इशानने पहिल्याच षटकात तीन चेंडूंत ४,६,४ अशा १४ धावा चोपल्या. इशानने फॉर्म कायम राखताना २०२२मध्ये आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये ट्वेंटी-२०त ४०० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. तिसऱ्या षटकात क्रेग यंगने भारताला धक्का देताना इशानचा ( २६ धावा, ११ चेंडू, ३ चौकार व २ षटकार) त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर LBW झाला. त्याने घेतलेला DRS ही वाया गेला. भारताने ४ षटकांत २ बाद ४५ धावा केल्या.
दीपक हुडाने फटकेबाजीला सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडला अद्यापही फलंदाजीला न पाठवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दीपक व हार्दिक यांनी अँडी मॅकब्रीनने टाकलेल्या ६व्या षटकात २१ धावा चोपल्या. इथे आयर्लंडच्या हातून सामना निसटला. दीपक व हार्दिक यांनी २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ८व्या षटकात हार्दिक ( २४) बाद झाला अन् दीपकसह त्याची ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ३ विकेट गेल्या तरी ऋतुराजला फलंदाजीला पाठवले गेले नाही. दिनेश कार्तिक जेव्हा मैदानावर आला तेव्हा चाहत्यांकडून RCB, RCB चा नारा झाला. दीपक व कार्तिकने भारताचा ७ विकेट्स राखून विजय पक्का केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. दीपक ४० धावांवर नाबाद राहिला.
Web Title: India vs Ireland 1st T20I : First win for Hardik Pandya as a captain in International cricket, India beat Ireland by 7 wickets An unbeaten 47 from Deepak Hooda
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.