नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना सुर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची तक्रार पंचांकडे केली. त्यानंतर पंचांनी सहमती दर्शवत सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. सुर्यकिरणांमुळे सामना थांबण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी नेपियरवर असे का घडले?
याआधीही अशी घटना घडली आहे. सुपर स्मॅश क्रिकेट लीगमधील सेंट्रल स्टेज आणि कँटेबरी किंग्ज यांच्यातील सामना अतिरिक्त सुर्यकिरणांमुळे थांबवण्यात आला होता. 2018 मध्ये लंडनमध्ये केंट स्पिटफायर आणि एसेस्क इगल्स यांच्यातील लढतही थांबवण्यात आली होती. नेपियरची खेळपट्टी ही जगातील अन्य खेळपट्टींपेक्षा वेगळी आहे. जगभरातील सर्व क्रिकेट स्टेडियम्समधील खेळपट्ट्या उत्तर-दक्षिण या दिशेला असतात, परंतु नेपियरची खेळपट्टी पूर्व-पश्चिम दिशेने आहे. त्यामुळे सुर्याची किरणे थेट फलंदाजाच्या डोळ्यावर येतात. भारताची अवस्था 1 बाद 44 धावा अशी असताना सामना थांबवण्यात आला.
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला. पहिल्या वन डे सामन्यात भारताला विजयासाठी अवघ्या 158 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.