वेलिंग्टन, भारत विरुद्घ न्यूझीलंड : कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करताना किवींना दमदार सलामी दिली. मात्र, कृणाल पांड्याने ही जोडी फोडली. त्याने मुन्रोला विजय शंकर करवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, त्यानंतर मैदानावर असे काही घडले ज्याने कृणालला रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. तो चक्क अंपायरवर चिडला. कर्णधार रोहित शर्माला त्याला शांत करावे लागले.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रोहितने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कृणाल व हार्दिक यांना संधी दिली. इरफान व युसूफ या पठाण बंधूंनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात खेळणारे हे दुसरे बंधू ठरले. कृणालने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच षटकात 10 धावा दिल्या. योगायोग म्हणजे 2016 साली हार्दिकने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं कृणालला गोलंदाजीसाठी मार्गदर्शन केले.
नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कृणालने किवीच्या सलामीवीराला बादे केले. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला कर्णधार केन विलियम्सनची विकेट मिळाली असती, परंतु नॉन स्ट्राईक एण्डला उभ्या असलेल्या सेइफर्टमुळे ते शक्य झाले नाही. विलियम्सनने टोलावलेला तो चेंडू सेइफर्टच्या दिशेने झेपावला आणि तो टिपण्यासाठी कृणाल प्रयत्नात होता. मात्र, त्याच्या या प्रयत्नाच्या मध्ये सेइफर्ट आला आणि त्याला झेल टिपता आला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कृणालने रागातच पंचाकडे दाद मागितली.
Web Title: India vs New Zealand 1st T20: Krunal pandya angry on umpire and tim Seifert
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.