वेलिंग्टन, भारत विरुद्घ न्यूझीलंड : कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करताना किवींना दमदार सलामी दिली. मात्र, कृणाल पांड्याने ही जोडी फोडली. त्याने मुन्रोला विजय शंकर करवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, त्यानंतर मैदानावर असे काही घडले ज्याने कृणालला रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. तो चक्क अंपायरवर चिडला. कर्णधार रोहित शर्माला त्याला शांत करावे लागले.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रोहितने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कृणाल व हार्दिक यांना संधी दिली. इरफान व युसूफ या पठाण बंधूंनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात खेळणारे हे दुसरे बंधू ठरले. कृणालने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच षटकात 10 धावा दिल्या. योगायोग म्हणजे 2016 साली हार्दिकने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं कृणालला गोलंदाजीसाठी मार्गदर्शन केले.