वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विदेशात गेल्या तीन महिन्यांमध्ये विजयाचा आलेख उंचावणारा भारतीय संघ आज न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय लढतीसह आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने पाऊल टाकणार आहे.नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आजपासून सुरू होत असलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत रोहितसमोर तीन मोठी आव्हानं आहेत. विशेष म्हणजे भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी यालाही ती आव्हानं पेलवली नाहीत. त्यामुळे 'हिटमॅन' ती आव्हानं यशस्वीपणे पेलून इतिहास घडवतो की अपयशी ठरतो, याची उत्सुकता आहे.
भारतीय संघाने वन डे मालिकेत यजमान न्यूझीलंडला पराभवाची चव चाखवली. पन वन डे मालिकेतील तीन सामन्यानंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आणि रोहितकडे नेतृत्व सोपविण्यात आले. ट्वेंटी-20 मालिकेत रोहितला 'कॅप्टन' कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 31 वर्षीय रोहितने 12 ट्वेंटी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यात 11 विजय मिळवण्यात भारताला यश आले. दुसरीकडे कोहलीने 20 ट्वेंटी-20 सामन्यांत नेतृत्व करताना भारताला 12 विजय मिळवून दिले आहेत. रोहितला आजच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून कर्णधार म्हणून कोहलीचा सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 41 विजयांसह ( 72 सामने) आघाडीवर आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये यजमानांचे पारडे जड आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 9 ट्वेंटी-20 सामने झाले आहेत आणि त्यापैकी न्यूझीलंडने सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे. 2009 नंतर भारतीय संघ प्रथमच न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे आणि या मालिकेत कर्णधार असलेल्या रोहितसमोर तीन मोठी आव्हानं आहेत. 2009 भारतीय संघ येथे दोन ट्वेंटी-20 सामने खेळला, परंतु त्यापैकी एकही सामना भारतीय संघाला जिंकता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये पहिला ट्वेंटी-20 विजय मिळवण्याचे पहिले आव्हान रोहितला पेलावे लागेल. भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकता आलेली नाही आणि भारतीय कर्णधाराला येथे ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावता आलेले नाही.