नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, तिथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करणार आहे तर शिखर धवनकडे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा असेल. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीला न्यूझीलंड मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. संजू सॅमसनचेही न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पुनरागमन झाले आहे. मात्र त्याला बांगलादेश दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. याशिवाय उमरान मलिकलाही जागा मिळाली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या खांद्यावर असणार आहे.
18 तारखेपासून टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक व्ही.व्ही एस लक्ष्मण यांनी संघाला एक कानमंत्र दिला आहे. लक्ष्मण यांनी सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. "टी-20 फॉरमॅटमध्ये तुम्हाला मोकळ्यापणाने आणि निडरपणे खेळावे लागेल, परंतु त्याच वेळी परिस्थिती पाहून खेळणे आणि संघाची गरज लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मला वाटते की लवचिकता महत्त्वाची आहे, मात्र टी-20 क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायचे असते", असा कानमंत्र लक्ष्मण यांनी दिला.
निडरपणे खेळा - लक्ष्मण "मला वाटते की टी-20 क्रिकेटमध्ये स्पष्ट विचारांची गरज आहे. मी या खेळाडूंसोबत जो वेळ घालवला आहे, त्यामुळे मी त्यांना एक यशस्वी आंतरराष्ट्रीय खेळाडू बनताना पाहत आहे. मला वाटते की त्यांची सर्वात मोठी ताकद हीच आहे." असे भारतीय संघाचे प्रशिक्षक व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी अधिक म्हटले.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत विरूद्ध न्यूझीलंड वेळापत्रक 18 नोव्हेंबर - पहिला टी-20 सामना, स्काय स्टेडियम, वेलिंग्टन, दुपारी 12 वाजल्यापासून 20 नोव्हेंबर - दुसरा टी-20 सामना, माउंट मौनगानुई, दुपारी 12 वाजल्यापासून 22 नोव्हेंबर - तिसरा टी-20 सामना, मॅक्लीन पार्क, नेपियर, दुपारी 12 वाजल्यापासून 25 नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ईडन पार्क, ऑकलंड, सकाळी 7.30 वाजल्यापासून 27 नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, सेडन पार्क, हॅमिल्टन, सकाळी 7.30 वाजल्यापासून 30 नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, सकाळी 7.30 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"