भारतासाठी करो या मरो असलेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली मोठी खेळी साकारेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीला फक्त तीन धावाच करता आल्या. यावेळी कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या नावावर जमा झाला आहे.
अर्धशतकवीर पृथ्वी शॉ बाद झाल्यावर कोहली फलंदाजीला आला. लंचपर्यंत कोहली खेळत होता. पण लंचनंतर कोहली झटपट बाद झाला. यावेळी साऊथीने कोहलीला पायचीत पकडले आणि त्याला स्वस्तात तंबूत धाडले.
कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम साऊथीने नोंदवला आहे. साऊथीने आतापर्यंत सर्वाधिक दहा वेळा कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानच्या नावावर होता.
पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक; लंचपर्यंत भारत २ बाद ८५युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी लंचचपर्यंत २ बाद ८५ अशी मजल मारली होती.
न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. खेळपट्टीवर गवत असल्यामुळे भारताची भंबेरी उडेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण पृथ्वीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी मयांकपेक्षा पृथ्वी जास्त आक्रमक खेळत होता.
मयांक हा सुरुवातीपासून चाचपडत खेळत होता. पण पृथ्वी हा आक्रमक फलंदाजी करत होता. पृथ्वीने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर पृथ्वीच्या फटक्यांमध्ये यावेळी नजाकत दिसली. पृथ्वीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताला पहिल्या सत्रामध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पण अर्धशतक झळकावल्यावर पृथ्वीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. पृथ्वीने ६४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली. लंच झाला तेव्हा भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली खेळत होते. पण लंचनंतर कोहली झटपट बाद झाला.