ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड तिसरा ट्वेंटी-20 सामना आज न्यूझीलंडमध्ये पहिली ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचा निर्धार भारतीय संघात महत्त्वाचा बदल अपेक्षित
हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ आज हॅमिल्टनच्या मैदानावर उतरेल तो मालिका विजयाच्या निर्धारानेच. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणखी एक विजय मिळवून भारताला ऐतिहासिक कामगिरीची नोंद करण्याची संधी आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली. त्यामुळे आज होणारा सामना हा मालिकेतील जेतेपद ठरवणारा आहे. या सामन्यात रोहितला कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे. रोहित आणि विराट यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करताना प्रत्येकी 12 ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे हॅमिल्टन येथे भारतीय संघाने विजय मिळवल्यास रोहितच्या खात्यात कर्णधार म्हणून 13 विजय नोंदवले जातील आणि तो विराटला मागे टाकेल.
दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडवर दुसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत सात विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा गेल्या दहा वर्षांतील न्यूझीलंडमधील हा पहिला विजय ठरला आहे. 2009 साली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन ट्वेंटी-20 सामने खेळला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. या विजयासह कर्णधार रोहितने एका विक्रमात विराट व महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्णधार म्हणून पहिल्या 14 सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत रोहित अव्वल ठरला आहे.
त्याने भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 12 सामने जिंकण्याच्या कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, कर्णधार म्हणून पहिल्या 14 सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंत रोहितने कोहली व धोनीलाही मागे टाकले. या दोघांनी पहिल्या 14 सामन्यांत प्रत्येकी 8 सामने जिंकले होते. रोहितने मात्र 12 सामने जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद व ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क यांच्याशी बरोबरी केली आहे.
भारतीय कर्णधार म्हणून ट्वेंटी-20त सर्वाधित 41 विजय मिळवण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. आज विजय मिळवल्यास न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. मागील तीन महिने भारतीय संघासाठी अविश्वसनीय राहिले. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकली, वन डे मालिकेतही भारताने विजयी पताका रोवला. त्यानंतर न्यूझीलंडमध्येही 10 वर्षांनी वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
Web Title: India vs New Zealand 3rd T20 : Rohit Sharma on verge of overhauling Virat Kohli's THIS record in Hamilton
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.