ठळक मुद्देस्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांची अविश्वसनीय कामगिरीभारतीय महिलांचा न्यूझीलंडवर 9 विकेट राखून विजयस्मृती मानधनाचे वन डे कारकिर्दीतील चौथे शतक
नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला. न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डे सामन्यात भारताने यजमानांवर 9 विकेट व 102 चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीने खणखणीत शतक झळकावले, तर जेमिमाने नाबाद 81 धावांची खेळी साकारली. 2018 वर्षात आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या स्मृतीचे हे कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. या शतकाबरोबर तिने आतापर्यंत एकाही भारतीय महिला फलंदाजाला न जमलेला विक्रम करून दाखवला.
न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 193 धावांचे लक्ष्य भारतीय महिलांनी 33 षटकात पूर्ण केले. 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताने हा सामना 9 विकेट राखून सहज जिंकला. जेमिमा व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना विक्रम केला. 2003 नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. 2003 मध्ये अंजू जैन आणि जया शर्मा यांनी 144 धावांची भागीदारी केली होती. जेमिमा आणि स्मृती या जोडीने तोही विक्रम मोडला.
स्मृतीने वन डे कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण केले. स्मृतीने 104 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 105 धावा केल्या. धावफलकावर 190 धावा असताना स्मृती माघारी परतली. जेमिमाने 94 चेंडूंत 9 चौकार खेचून नाबाद 81 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्मृतीने या शतकाबरोबार 'SENA' देशांमध्ये म्हणजेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे वन डे शतक करण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत भारताच्या एकाही महिला खेळाडूला 'SENA' देशांमध्ये शतक करता आले नाही. आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या क्लेर टेलरच्या नावावर होता.
Web Title: India vs New Zealand ODI: SMRITI MANDHANA is the first Indian women to score century in 'SENA' country
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.