ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड पहिला वन डे सामना बुधवारीऑस्ट्रेलियातील वन डे मालिका विजयानंतर लक्ष्य न्यूझीलंडभारताने 2009मध्ये न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती
नेपीयर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी ऑकलंडला दाखल झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ किवींच्या देशात पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. बुधवारपासून दोन देशांमधील वन डे मालिकेला सुरुवात होणार असून आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत कोहली कोणत्या शिलेदारांसह मैदानात उतरेल हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पांड्या व राहुल यांच्या जागी संघात विजय शंकर व शुबमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे, परंतु त्यांना संधी मिळेलच असे नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शंकर आणि युजवेंद्र चहल यांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली होती. चहलने त्याचं सोनं करताना सहा विकेट घेतल्या. शंकरने प्रभावी गोलंदाजी करताना 6 षटकांत 23 धावा दिल्या, परंतु त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. केदार जाधवने 57 चेंडूंत नाबाद 61 धावा करून न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यासाठी दावेदारी सांगितली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत बुधवारी नेपीयर येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाजांमधील एका स्थानासाठी मोहम्मद खलील व शंकर यांच्यात टॉस करावा लागणार आहे. अॅडलेड वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावांची मेजवानी देणाऱ्या मोहम्मद सिराजचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. फलंदाजीत अंबाती रायुडूला संधी मिळणे अवघड आहे. त्याच्याजागी जाधव पहिल्या सामन्यात खेळू शकतो.
संभाव्य संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.