दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताच्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी पाहायला मिळाली. तीन अर्धशतके झळकावल्यावरही भारताला 242 धावा करता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर बिनबाद 63 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे न्यूझीलंडपुढे आता केवळ 179 धावांची आघाडी आहे. पहिल्या दिवसावर न्यूझीलंडचाच वरचष्मा पाहायला मिळाल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि टॉम ब्लून्डेल यांनी संयमी खेळ करत भारतावर दबाव वाढवला.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके लगावली, पण तरीही भारताला पहिल्या डावात तिनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांनंतरही भारताचा पहिला डाव 242 धावांत संपुष्टात आला. भारताच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, पण अर्धशतकानंतर त्यांना मोठी खेळी साकारण्यात सपशेल अपयश आले. त्यामुळे तीन अर्धशतकानंतरही भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
पहिल्या सत्रात पृथ्वी शॉ बाद झाला. पण बाद होण्यापूर्वी पृथ्वीने 64 चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 54 धावांची खेळी साकारली होती. दुसऱ्या सत्रात विहारी बाद झाला. विहारीने 10 चौकारांच्या जोरावर 55 धावा केल्या. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पुजारा बाद झाला आणि त्याने सहा चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.