नवी दिल्ली : ‘भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जूनपासून साऊदम्पटन मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकायचा झाल्यास प्रतिस्पर्धी कर्णधार केन विलियम्सन याला लवकरात लवकर बाद करावेच लागेल,’ असे मत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केले आहे.
‘केनच्या फलंदाजीत मोठ्या उणिवा नाहीत. कुठलाही बलाढ्य फलंदाज चांगल्या चेंडूवर बाद होऊ शकतो. आम्हाला केनच्या फलंदाजीबाबत जाणीव आहेच. वेगवान गोलंदाज या नात्याने मला संधी मिळाल्यास मी माझ्या बलस्थानांसह मारा करणार आहे. केनला लवकर बाद केल्यास संघाला लाभ होईल. न्यूझीलंड संघाची फलंदाजी भक्कम आहे. याशिवाय अनुभवी तसेच धोकादायक गोलंदाज आहेत. इंग्लंडमधील परिस्थितीत न्यूझीलंडला पराभूत करणे आमच्यासाठी आव्हान असेल,’ असे उमेश म्हणाला.
अंतिम सामना जिंकायचा असेल तर योजनाबद्ध खेळ करावा लागेल. इंग्लंडमधील वातावरण बदलले की खेळपट्टीचे स्वरूपही बदलते. कसोटीपटू या नात्याने इतकेच वाटते की, शिस्तबद्ध वाटचाल करावी लागेल. सर्वच आघाड्यांवर अखेरपर्यंत गाफील राहून चालणार नाही. जो संघ सर्वच बाबतीत वरचढ ठरेल, तो बाजी मारू शकतो,’ असे मत उमेशने व्यक्त केले.