मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कर्णधार क्विंटन डीकॉक आणि तेंदा बवुमा यांच्या दमदार खेळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. क्विंटन डीकॉकने सुरुवातीपासूनच जोरदार हल्ला भारताच्या गोलंदाजीवर चढवला. क्विंटन डीकॉकने 37 चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर 52 धावांची खेळी साकारली. क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर पदार्पण करणाऱ्या बवुमाने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बवुमाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 49 धावा केल्या.
कोहली आणि शास्त्री यांनी केली 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार
तब्बल 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या भारताच्या या व्यक्तीचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सत्कार केला. सामना सुरु होण्यापूर्वी कोहली आणि शास्त्री यांनी दलजित सिंग यांचा सत्कार केल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी यष्टीरक्षक म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून ते क्रिकेटची सेवा करत आहेत. 1961 साली त्यांनी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले आणि आतापर्यंत ते आतापर्यंत ते क्रिकेटची सेवा करत होते. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असो किंवा विराट कोहली, कुणाचेही पान त्यांच्याशिवाय हलत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटची हानी झाल्याचे म्हटले जात आहे. यष्टीरक्षक म्हणून ते 87 प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 3964 धावा करताना सात शतके आणि 19 अर्धशतके लगावली. त्याचबरोबर यष्ट्यांमागे त्यांनी 225 बळी मिळवले. क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी जवळपास 22 वर्षे पीच क्युरेटर म्हणूनही काम पाहिले. बीसीसीआयने त्यांना भारतातील क्युरेटरचे प्रमुखही बनवले होते.
पाच वर्षांनंतर हार्दिक पंड्या झाला होता दुखापतग्रस्त, हे होतं कारण
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला गेले दोन महिने क्रिकेटपासून लांब होता. कारण दोन महिन्यापूर्वी हार्दिकला त्रास जाणून लागला होता. हा त्रास पाच वर्षांनंतर पंड्याला जाणवू लागला होता. त्यामुळे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंड्याने या सामन्यात पुनरागमन केले आहे.
पाच वर्षांपूर्वी पंड्या पाठिच्या दुखापतीने त्रस्त झाला होता. ही दुखापत त्याची पुन्हा एकदा बळावली, त्यामुळे त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला होता. दुखापतीवर उपचार केल्यानंतर पंड्या आता पूर्णपणे फिट आहे.
याबाबत पंड्या म्हणाला की, " गेले दोन महिने मी क्रिकेटपासून लांब होतो. कारण माझे पाठिचे दुखणे पुन्हा एकगा सुरु झाले होते. पाच वर्षांपूर्वी मला असाच त्रास झाला होता. पण आता दुखापतीवर मी उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर फिट राहण्यासाठी बरीच तयारीही केली आहे."
मोहालीची खेळपट्टी कशी असेल, सांगत आहेत सुनील गावस्कर
मोहाली येथे काही मिनिटांमध्ये दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्यातरी सामन्यावर पावसाचे सावट दिसत नाही. पण मोहालीची खेळपट्टी असेल तरी कशी, याबाबत भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मोहालीच्या खेळपट्टीबाबत गावस्कर म्हणाले की, " खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येईल. पण जसा चेंडू जुना होत जाईल तसा तो बॅटवर थोड्या उशिराने येईल. खेळपट्टीवर काही काळे डाग आहेत, त्यामुळे कालांतराने चेंडू संथगतीने येईल."
दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात पाऊस कधी पडणार, जाणून घ्या...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.
दोन्ही संघ या सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत.
मोहाली येथील सामना सुरु झाल्यावर अर्ध्या किंवा एका तासाने पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता पाऊस बाजी मारणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
Web Title: India vs South Africa, 2nd T-20: South Africa given 150 runs target to India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.