बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं 11व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानं हेड्रीक्सला बाद केले. कोहलीनं सुपर कॅच घेत हेंड्रीक्सला माघारी पाठवले. क्विंटन डी कॉकनं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी रचलेल्या पायावर आफ्रिकेनं विजय साजरा केला अन् मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या घरच्या मैदानावर विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची फटकेबाजीची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आफ्रिकेनं पहिल्याच षटकासाठी फिरकीपटू बीजॉर्न फॉर्टूइनला पाचारण केले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर धवनने चौकार खेचला आणि टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या चौकारासह धवनने एक विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धवनने 7000 धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो रोहित, कोहली आणि सुरेश रैना यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
रोहितनं दौन चौकार खेचून आशा दाखवली, परंतु अवघ्या 9 धावांत तो माघारी परतला. त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. मात्र, हा विश्वविक्रम क्षणिक ठरला. कोहली आणि रोहित यांच्यातील अव्वल स्थानाची शर्यत अशीच सुरू राहणार आहे. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीनं हिटमॅन रोहितला मागे टाकले, पण आज रोहितनं 9 धावा करून अव्वल स्थान पुन्हा पटकावले. त्याचे हे अव्वल स्थान क्षणिक ठरले. तिसरी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. रोहितच्या नावावर 98 सामन्यांत 2443 धावा आहेत आणि कोहलीनं हा पल्ला ओलांडला आहे. पण, तोही 9 धावा करून माघारी परतला.
कोहली बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरल आपली छाप पाडण्याची संधी होती. पंतने काही फटके खेचून आश्वासक खेळ केला, परंतु त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 19 धावा करून माघारी परतला. त्यापाठोपाठ अय्यरही ( 5) बाद झाला. 15 षटकांपर्यंत भारताचे 6 फलंदाज 99 धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
Web Title: India vs South Africa, 3rd T20 : South Africa win by 9-wickets and level the T20I series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.