भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रांची येथे होणाऱ्या या कसोटीत टीम इंडियाचेच पारडे जड मानले जात आहे. भारतानं या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या कसोटीत 203 धावांनी, तर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, विराट कोहली यांनी फलंदाजीत तर आर अश्विन, रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीत प्रभाव पाडला आहे. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून आफ्रिकेवर निर्भेळ यश मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. या कसोटीत कर्णधार कोहलीला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधाराचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोण आहे हा दिग्गज आणि कोणता विक्रम?
कोहलीनं दुसऱ्या कसोटीत द्विशतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली... कसोटीतील 7000 धावांचा पल्लाही त्यानं पुणे कसोटीत पार केला. शिवाय सर्वाधिक डावानं कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारात दुसरे स्थान पटकावले, अशा अनेक विक्रमांचा पुण्यात पाऊस पडला. रांचीतही कोहलीकडून हीच अपेक्षा आहे. या कसोटीत कोहलीनं शतकी खेळी करताच ऑसी दिग्गज रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला जाऊ शकतो. कोहलीचे हे कसोटी कारकिर्दीतील 27 वे शतक ठरेल, तर कर्णधार म्हणून 20वे शतक असणार आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांत कोहली थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेईल आणि पाँटिंगची तिसऱ्या स्थानी घसरण होईल.
कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतक झळकावण्याचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथकडे ( 25 ) आहे. त्यानंतर पाँटिंग व कोहली प्रत्येकी 19 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहेत. त्यापाठोपाठ स्टीव्ह स्मिथ व अॅलन बॉर्डर 15 शतकांसकह संयुक्तपणे तिसऱ्या आणि सर डॉन ब्रॅडमन ( 14) चौथ्या स्थानी आहेत.
अशी असेल टीम इंडियारोहित शर्मा, मयांक अग्रवाल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा, उमेश यादव/मोहम्मद शमी.