बंगळुरू - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा सामना आज बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तर नंतरच्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिका २-२ अशा बरोबरीत आहे. आता रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचं लक्ष्य या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याचं आहे. जर हा सामना जिंकला तर घरच्या मैदानावर भारताचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला मालिका विजय ठरणार आहे.
मात्र भारताच्या या इराद्यांमध्ये पाऊस मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगळुरूमध्ये संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण सामन्यादरम्यान आर्द्रता ९२ ते ९३ टक्के राहण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण सामन्यादरम्यान ढगांचं आच्छादन असण्याची शक्यता ९९ टक्के आहे.
दरम्यान, या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. भारताकडून ईशान किशनने जबरदस्त फलंदाजी करत संपूर्ण सामन्यात सर्वाधिक धावा जमवल्या आहेत. पंत आणि श्रेयस अय्यरचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. त्याला मोक्याच्या क्षणी धावा जमवता आलेल्या नाही. मात्र हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक फिनिशरची भूमिका चोख बजावत असल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.